अंकुरम विद्यामंदिरचा “अंकुरोत्सव २०२६” वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

फोटो – अंकुरम विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक नाट्यप्रसंगात विद्यार्थ्यांचा आकर्षक वेशभूषेसह दमदार अभिनय.

एन.डी.नलवडे
वाशी,दि.२१ (संपादक) येथील अंकुरम विद्यामंदिर येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम “अंकुरोत्सव २०२६” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.अशोक कदम यांची उपस्थीती होती.
यावेळी  श्रीरामपुर येथील प्रगतशील शेतकरी शेषराव पवार,बारामती येथील कॉलेज ऑफ फार्मसी उपप्राचार्य प्रा.राजेंद्र बांदल,प्रा.श्रीकांत कदम,डॉ. गणेश तावरे,शिवाजी ज्ञान शिक्षण मंडळचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद पवार, उपाध्यक्ष केशर पवार, सचिव रोहिणी पवार, संचालक राजेश आवटे, ओंकार पवार, नगरसेवक विकास पवार यांच्यासह विविध क्षेञातील मान्यवर, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ.कदम यांनी शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून संस्कार, शिस्त, कष्ट आणि स्वप्न पाहण्याची हिंमत यांचा संगम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ते मोठे यश मिळवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात लहान गटातील चिमुकल्यांनी “स्कूल चले हम” तसेच “आई मला खेळायला जायचे” या गीतांवर निरागस नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या गाजलेल्या गाण्यांवर  विशेष नृत्य सादरीकरण करण्यात आले.
इतिहासावर आधारित सादरीकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर “स्वराज्य स्थापना ते शिवराज्याभिषेक” हा देखणा कार्यक्रम सादर करण्यात आला.

महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारे “नारीशक्ती” आणि “जय जिजाऊ” या सादरीकरणांमधून राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली.विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि संदेशप्रधान सादरीकरणामुळे पालक व उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
यावेळी ग्रामीण भागात मूल्यवर्धित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शिवाजी ज्ञान विहार शिक्षण मंडळ या संस्थेच्या कार्याचा गौरव करत प्रगतशिल शेतकरी शेषराव पवार यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांची देणगी संस्थेस दिली.त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे सर्वांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुरम विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सोमनाथ स्वामी, समन्वयक पूजा सावंत, मीनाक्षी जाधव, गंगा पवार यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल जैन, आश्लेषा खोसे यांनी केले.आभार आभार शशिकांत पवार यांनी मानले.

स्नेहसंमेलनातील ऐतिहासिक नाट्यप्रसंग विशेष आकर्षण ठरले. “अफजल खान वध” हा प्रसंग विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनयातून साकारत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली ऐतिहासिक भेट संवाद, पोशाख व पार्श्वसंगीताच्या सहाय्याने जिवंत करण्यात आली. धैर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्यनिष्ठेचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासाचा थरार अनुभवायला मिळाला.

Leave a Comment

error: Content is protected !!