इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा : उरलेल्या काळात अभ्यासाचे अचूक नियोजन गरजेचे – पुनम चेडे

पूनम गौतम चेडे

वाशी,ता.१३ (प्रतिनीधी) इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ताण व घाईचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योग्य व वास्तववादी नियोजन केल्यास उरलेला कालावधीही यशस्वी तयारीसाठी पुरेसा ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. नियोजनबद्ध अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेतील कामगिरीतही सुधारणा होते,असे मत जे.आय.आर.टी तंञ प्रशालेतील विज्ञान विषयाच्या शिक्षिका पुनम गौतम चेडे यांनी व्यक्त केले आहे.
शिक्षिका चेडे यांनी सांगीतले विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या क्षमतेनुसार योग्य वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. दिवसातील एकाग्रता जास्त असलेल्या वेळेत गणित व विज्ञानसारखे कठीण विषय ठेवावेत, तर तुलनेने सोपे विषय कमी वेळेत पूर्ण करावेत. संपूर्ण अभ्यासक्रम एकदम करण्याऐवजी तो छोट्या भागांत विभागल्यास अभ्यास अधिक सोपा व परिणामकारक ठरतो.
उरलेल्या दिवसांत नवीन धडे सुरू करण्यापेक्षा पुनरावृत्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्वतःचे संक्षिप्त नोट्स, सूत्रांची यादी व महत्त्वाचे मुद्दे तयार ठेवल्यास शेवटच्या टप्प्यात अभ्यास सुलभ होतो. तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका वेळेच्या मर्यादेत सोडवण्याचा सराव केल्यास उत्तरलेखनाची गती वाढून परीक्षेची भीती कमी होते.
अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दर ४० ते ५० मिनिटांनी छोटा ब्रेक, पुरेशी झोप व मोबाईलचा मर्यादित वापर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतो. इतरांशी तुलना न करता रोजच्या छोट्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केल्यास सकारात्मकता टिकून राहते.
योग्य नियोजन, नियमित पुनरावृत्ती व आत्मविश्वास या त्रिसूत्रीवर भर दिल्यास दहावीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी तणावाचा विषय न राहता यशाचा टप्पा ठरू शकतो, असे शिक्षिका पुनम गौतम चेडे यांनी सांगीतले

Leave a Comment

error: Content is protected !!