एस.एल. पवार यांचा अमृतमहोत्सव ‘ग्रंथतुला’ उपक्रमाने उत्साहात

मा.श्री एस.एल. पवार (भाऊ) यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त त्यांच्या वजनाएवढ्या पुस्तकांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
(फोटो सौजन्य – निसर्ग फोटो स्टुडिओ)

वाशी : येथील अजिंक्य विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.एल. पवार यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त सोमवारी (ता.१६) ग्रंथतुला उपक्रमासह विविध कार्यक्रम जल्लोषात पार पडले. त्यांच्या वजनाएवढ्या पुस्तकांची तुला करून ‘ज्ञानदानाचा प्रेरक संदेश देण्यात आला. या सोहळ्याने शिक्षणप्रेमी व मान्यवरांना भावनिक अनुभव दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजयाबाई गायकवाड, सुरेश कवडे व नागनाथ नाईकवाडी यांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, कुटुंबीय व शुभेच्छुक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार व मनीषा माने यांनी केले, तर सूत्रसंचालन बाबा गवळी यांनी केले. मनोगतातून मान्यवरांनी पवार यांच्या पाच दशकांच्या शिक्षणसेवेचा गौरव करत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. नवोदय, सैनिक स्कूल व इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुमारे ५० वर्षे मोफत मार्गदर्शन करून शेकडो विद्यार्थ्यांना दिशा दिल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
शिस्तबद्ध, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि वाचनसंस्कार यांवर भर देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षणसंस्था उभारून समाजाशी नाते दृढ ठेवले आहे. ग्रंथतुला उपक्रमातून ‘ज्ञान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश अधोरेखित झाला. उपस्थितांनी पवार यांच्या कार्याचा आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!