कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला उत्साहात.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी उपस्थीत मान्यवर.

वाशी,ता.११ (प्रतिनिधी): कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर उपक्रमाचे आयोजन  प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
ता.११ रोजी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पारगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. महादेव उंद्रे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कर्मवीर डॉ. जगदाळे हे त्यागी व दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बडे आर. एन. होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारगाव कन्या प्रशालेत झालेल्या कार्यक्रमात प्रा. लक्ष्मण धावारे यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. मामासाहेबांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात शाळा व महाविद्यालये स्थापन करून गोरगरीब व वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब ठवरे होते. यावेळी हनुमंत सावंत
यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
कमळेश्वरी पिंपळगाव ता.वाशी येथील कमळेश्वरी विद्यालयात प्रा. राहुल कुलकर्णी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. मामांच्या कार्याचा गौरव म्हणून अभ्यासकेंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, वीरपत्नी व वीरमातांचा सत्कार, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांना मदत आदी कार्यांचा आढावा त्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. बी. बहिरट होते. यावेळी प्रा. डॉ. आनंद करडे यांची  उपस्थिती होती.
या व्याख्यानमालेस विद्यार्थी व शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!