
वाशी, ता. १३ (संपादक): कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वतीने वाशी व भूम तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहरातील जे.आय.आर.टी. शाळेत नुकत्याच पार पडलेल्या व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दैवशाला रसाळ यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर मामांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा. डॉ. रसाळ यांनी मामासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्यावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानून मामासाहेबांनी आयुष्यभर कार्य केले, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांमुळे व कार्यामुळे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले असून आजही त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. आश्विनी नवले, प्रा. सुनीता डोके, शिक्षिका पूनम चेडे, श्री. कीर्तीकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनीता डोके यांनी केले. सूत्रसंचालन पूनम चेडे यांनी केले, तर आभार प्रा. आश्विनी नवले यांनी मानले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा व्याख्यानमाला महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.