
एन.डी.नलवडे
वाशी, दि. २० (संपादक) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला ‘A+’ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये महाविद्यालयाचा लौकिक अधिकच वृद्धिंगत झाला आहे.
सदरच्या मानांकनासाठी प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, प्राध्यापकवेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक काम केले. या उल्लेखनीय यशाबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील,खजिनदार जयकुमार शितोळे यांनी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे
राज्यातील एकूण १०,७१२ शाळांची या मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ४२९ शाळांना ‘A+’ श्रेणी मिळाली असून, धाराशिव जिल्ह्यातील या महाविद्यालयाच्या कनिष्ठ शाखेने उत्कृष्ट शैक्षणिक, प्रशासकीय व सहशालेय उपक्रमांच्या जोरावर ‘A+’ मानांकन मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. अध्यापनातील सातत्य, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, गुणवत्तापूर्ण निकाल, सुसज्ज शैक्षणिक वातावरण व सर्वांगीण विकास या महत्त्वाच्या निकषांवर महाविद्यालयाने उच्च दर्जा सिद्ध केला आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संस्थेचा ध्यास कायम राहील. ‘A+’ मानांकन सध्या मिळाले असून, आगामी काळातही शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्याधारित शिक्षण, नवोपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली असून, भविष्यात अधिक उच्च शैक्षणिक मानके गाठण्याचा आत्मविश्वास संस्थेला प्राप्त झाला आहे.