तेरखेडा येथे सलग घरफोड्या; १७ तोळे सोने व ७५ हजारांची रोकड लंपास

तेरखेडा येथे सलग घरफोड्या; १७ तोळे सोने व ७५ हजारांची रोकड लंपास

तेरखेडा,दि.११ (प्रतिनिधी) : गावात बुधवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या करून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे तेरखेडा परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी लोकहित नगर परिसरातील आझाद मुजावर व दीपक बांगर यांच्या बंद घरांची कुलपे हातोडीने फोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून शोधाशोध करण्यात आली; मात्र घरात मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.
यानंतर चोरट्यांनी इंदिरा नगर येथील शंकर भगवान साळवे यांच्या घरावर डल्ला मारला. त्या वेळी साळवे दाम्पत्य हॉलमध्ये झोपलेले होते. गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
सकाळी चोरी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे तेरखेडा गावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!