पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरण उघड; वाशी पोलिसांची धडक कारवाई, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पवनचक्कीच्या काँपर केबल चोरीच्या कारवाई नतंर मुद्देमालासह पोलीस निरिक्षक शंकर शिंदे,बिट अंमलदार कपिल बोरकर व पोलीस पथक,

वाशी, ता.१२ (लोकनीती न्यूज): पवनचक्क्यांमधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या धाडीत तब्बल ४३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (ता.१२) रोजी सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून चोरीस गेलेला कॉपर केबलचा साठा मौजे वाशी शिवारातील गट क्रमांक २७९ ब येथील शेतात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून बिट अंमलदार के. एस. बोरकर व पोलीस अंमलदार राम शेळके यांनी पथकासह छापा टाकला.
या कारवाईत ५३ बंडल अंदाजे १,५०० किलो कॉपर केबल जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे १७ लाख १० हजार रुपये आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला एमएच १२ सीएच ५२९० क्रमांकाचा ट्रक (अंदाजे किंमत २५ लाख रुपये) आणि एमएच २५ बीडी ५५३८ क्रमांकाची दुचाकी (अंदाजे किंमत १ लाख २५ हजार रुपये) जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४३ लाख ३५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक तपासात संबंधित टोळी गेल्या दोन वर्षांपासून वाशी तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांत सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजेंद्र काळे, माणिक काळे, दया काळे (रा. कासारखानी), रामा उर्फ शेंडी काळे, बबलू शिंदे (रा. तेरखेडा) व सचिन शिंदे (रा. इटकूर, ता. कळंब) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले व पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार कपिल बोरकर, राम शेळके, विठ्ठल मलंगनेर, गोपीनाथ पवार आणि नसीर सय्यद यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

error: Content is protected !!