वाशी, दि.०८ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील वाशी फाटा ते सरमकुंडी फाटा दरम्यान असलेल्या प्रताप पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलचे पैसे न देता पळून जाणाऱ्या दोन इसमांना वाशी पोलिसांनी येरमाळा पोलिसांच्या मदतीने अटक केली.सदर घटना शनिवार (ता.सात) रोजी अकरा वाजणेच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन पेट्रोल पंपावरील कामगारास पेट्रोल टाकी ‘फुल’ करण्यास सांगितले. कामगाराने पेट्रोल भरल्यानंतर त्याने ९६४ रुपयांची मागणी केली. त्यावेळी मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने कामगाराच्या दिशेने पिस्तुल रोखून “बाजूला हो, नाहीतर ठोकीन,” अशी धमकी देत पैसे न देता मोटारसायकलने तेथून पळ काढला.
यानतंर पंपाचे मालक संतोष शिवाजी काळे यांनी ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस अंमलदार विलास जाधवर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, पोलिस अधीक्षक रीतू खोकर, अप्पर पोलिस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर नाकाबंदीची सूचना देण्यात आली. आरोपी मोटारसायकलवरून येरमाळा दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर वाशी व येरमाळा पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या हॉटेल सूर्या येथे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे लखन शाहू मोहिते (रा. सपाळी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, सध्या मु. पारगाव, ता. वाशी) व दिनेश भगवान चव्हाण (रा. कोपरा, ता. आंबेजोगाई, जि. बीड, सध्या मु. पारगाव, ता. वाशी) अशी सांगितली.
आरोपींकडून एक धारदार चाकू, पक्कड, दोन मोबाईल, काळ्या रंगाची एअर गन तसेच होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पेट्रोल पंपावरील कामगार तानाजी विष्णू भोरे यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत घोडके हे पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.