
वाशी, ता.१९ (प्रतिनिधी) : भारतीय किसान संघ, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी (ता.१८) शेतकरी बांधवांसाठी एकदिवसीय कृषी अभ्यासवर्ग उत्साहात पार पडला. यावेळी कृषीतज्ञ डॉ. दादा लाड यांचे मार्गदर्शन लाभले; तसेच पद्मश्री सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी हा अन्नसाखळीचा केंद्रबिंदू असल्याचे अधोरेखित करत बदलत्या हवामानानुसार पीकपद्धतीत सुधारणा व आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज वक्त्यांनी मांडली. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ज्वारी, गहू व सोयाबीन या पिकांच्या उत्पादनवाढीवर विशेष भर देण्यात आला. सुधारित बियाणे, मृदा परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, जलसंवर्धन व शाश्वत शेती या घटकांचा समन्वय साधल्यास उत्पादन दुप्पट करणे शक्य असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रा. अरुण गुट्टे (विद्यावेत्ता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ) यांनी पीक नियोजन, तंत्रज्ञान वापर व हवामान बदलाशी जुळवून घेण्याचे उपाय स्पष्ट केले. तर डॉ. प्रवीण पतंगे यांनी पशुधन व्यवस्थापन व पूरक व्यवसायातून उत्पन्नवाढीचे मार्ग सांगितले.
कार्यक्रमात डॉ. लाड यांचा सत्कार नितीन घुले (जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ) व रविंद्रजी कदम (जिल्हा संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांच्या हस्ते करण्यात आला. अभ्यासवर्गास जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त केले.