वैचारिक पिढी घडवणे ही काळाची गरज : प्रा. डॉ. क्रांती मोरे

फोटो : धाराशिव ग्रथोत्सव प्रसंगी ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व कार्य’ या विषयावर आयोजीत परिसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. क्रांती मोरे.

एन.डी.नलवडे
वाशी, ता. १७ (संपादक) : महापुरुषांच्या केवळ जयंती-आरत्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे अधिक महत्त्वाचे असून समाजपरिवर्तनासाठी वैचारिक पिढी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. डॉ. क्रांती मोरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचे कार्य जपण्याची गरज असल्याचे सांगुण  त्यांनी महिला सक्षमीकरणाबाबतही प्रभावी विचार मांडले.
त्या येथील अजिंक्य विद्या मंदिरच्या प्रांगणात धाराशिव  ग्रंथोत्सव २०२५ निमित्त आयोजित ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर : जीवन व कार्य’ या विषयावरील विशेष परिसंवादाच्या सकाळच्या सत्रात रविवार (ता.१५) बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक युवराज नळे होते.
यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढेकणे,व.ग.सुर्यवंशी आदिंची व्यासपिठावर उपस्थीती होती.
पुढे बोलताना “महिला जोपर्यंत वाईट प्रवृत्तीचा विरोध करणार नाहीत, तोपर्यंत जिजाऊ व अहिल्याबाई घडणार नाहीत,” तसेच अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या सासऱ्यांनी, मल्हारराव होळकर यांनी सर्वांगीण शिक्षण देत सतीप्रथेचा विरोध करून राज्यकारभाराची जबाबदारी दिली.
दिलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी तत्कालीन चालीरुढींना झुगारून प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले आणि म्हणूनच त्या ‘पुण्यश्लोक’ ठरल्या. मंदिरे, घाट, विहिरी उभारून धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी लोककल्याणाची परंपरा निर्माण केली.
महिलांनी केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक सक्षमीकरण साधणे आवश्यक असून शिक्षण हे परिवर्तनाचे प्रमुख साधन असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध’ म्हटल्याची आठवण करून देत अन्यायाविरुद्ध सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले..
अध्यक्षीय भाषणात युवराज नळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकीर्दीला सुवर्णकाळ संबोधत मंदिर, घाट, विहिरी उभारणी, जल-पर्यावरण संवर्धन तसेच उद्योगांना चालना देऊन रोजगारनिर्मिती केल्याचे सांगितले. महेश्वरी साडी परंपरेचा उल्लेख करत त्यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली.
यावेळी व. ग. सूर्यवंशी यांनी स्त्री चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना विश्वकर यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी मानले. ग्रंथचालक, ग्रंथपाल, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!