
फोटो – छञपती शिवाजी महाराज चौकात रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थीत युवक.
वाशी, ता. २७ (प्रतिनिधी): राम नवमी निमित्त शहरात गुरुवार (ता. २६) भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तरुणांनी आणि रामभक्तांनी एकत्र येत श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा संगम घडवून आणला.
सकाळपासूनच शहरातील राम मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांच्या पुढाकारातून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. धार्मिक उत्साहाबरोबरच सामाजिक एकात्मतेचे दर्शनही या कार्यक्रमातून घडले.
सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. राम मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळ प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव ‘पाळणा’ गाऊन साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.
जन्मोत्सवानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरम्याण छञपती शिवाजी महाराज चौकात ह.भ.प. आबा थोबडे महाराज यांच्या उपस्थीत प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कृष्णा शेरकर,सचिन गवारे, ऋषिकेश गपाट,आदित्य जगताप यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि तरुण रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच शहरात रामनवमी उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.