शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद७८ रक्तदात्यांचा सहभाग; समाजाभिमुख उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

वाशी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (ता.१६) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या समाजोपयोगी उपक्रमात ७८ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित केली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून युवक, शिवप्रेमी तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलनाची प्रक्रिया पार पडली.
रक्तदात्यांसाठी वैद्यकीय तपासणी, विश्रांती व अल्पोपहाराची योग्य व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली होती. प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवकांचा उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला. शिवजयंती साजरी करताना समाजसेवेचा संदेश देण्याचा समितीचा हेतू या उपक्रमातून प्रकर्षाने जाणवला.
या शिबिरात शासकीय रक्त केंद्र वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील वैद्यकीय पथकाने रक्तसंकलन केले. डॉ. दिपमाला करंडे, विठ्ठल कांबळे, दिप्ती बंगळे, गणेश साळुंके व निलावती जानराव यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.
रक्तदानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते, ही जाणीव अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने आयोजित शिबिरातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचला. शिबिर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!