वाशी, दि. २२ (प्रतिनिधी) : आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुण-तरुणीचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर पाटीजवळील वळणावर कारने टोलवे कमानीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. २२) सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय नामदेव शिनगारे (वय २५) व मूळ विजोरा ता. वाशी येथील, सध्या वाशी येथे वास्तव्यास असलेल्या अक्षया सुनील चव्हाण (वय २३) यांचा मागील रविवारी (दि. १५) रोजी मांजरसुंबा, जि. बीड येथील कन्हैया मंगल कार्यालयात साखरपुडा पार पडला होता.
यानंतर अक्षया हिची लातूर येथे रविवारी (दि. २२) महापारेषणची परीक्षा असल्याने अक्षय व अक्षया हे चालकासह पहाटे वाशी येथून टाटा नेक्सॉन (क्र. MH 25 BF 5064) या कारने लातूरकडे निघाले होते. दरम्यान, सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील अचानक नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीवर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात आकांक्षा चव्हाण व अक्षय शिनगारे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक अक्षय यादव शिरसट (वय २२) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
साखरपुड्याच्या अवघ्या आठवड्यातच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.