धाराशिव ग्रंथोत्सवाचा उत्साहपूर्ण समारोप; परिसंवाद व कवीसंमेलनाने रंगली सांगता

संपादक – एन.डी.नलवडे

कवीसंमेलन प्रसंगी उपस्थित कवींची बहारदार उपस्थिती.

वाशी: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अजिंक्य विद्या मंदिर प्रांगणात आयोजित दोन दिवसीय ‘धाराशिव ग्रंथोत्सवा’चा समारोप रविवारी (ता.१५) उत्साहात झाला. १४ व १५ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या या ग्रंथोत्सवाला साहित्यप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
समारोप दिनाची सुरुवात ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर : जीवन व कार्य’ या विषयावरील परिसंवादाने झाली. अध्यक्षस्थानी साहित्यिक व इतिहास संशोधक युवराज (बप्पा) नळे होते. डॉ. क्रांती मोरे व सौ. माधुरी घोडके यांनी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी धोरणांचा आणि प्रशासकीय दूरदृष्टीचा सखोल वेध घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना विश्वेकर यांनी केले.
यानंतर दुपारच्या सत्रात कवीसंमेलन रंगले. अध्यक्षस्थानी अश्विनी धाट होत्या. विविध कवींनी सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवर कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. बालकवी शिधोजी माने यांनी सुरेश भट्ट यांच्या ‘एवढे दे पांडुरंगा’ या कवितेचे सादरीकरण करून विशेष लक्ष वेधले. समारोप अश्विनी धाट यांच्या ‘पावसाला ही बायको पाहिजे होती’ या कवितेने झाला. सूत्रसंचालन अविनाश भारती यांनी केले.

ग्रंथोत्सवात पुस्तकांच्या स्टॉलला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका स्टॉलवर ग्रंथ खरेदीत मग्न झालेले ग्रंथप्रेमी.

सायंकाळी समारोप सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य लक्ष्मीकांत पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, प्रा. अशोक दुनधव, अंकुर सोनटक्के, एस. एल. पवार आदी उपस्थित होते. मान्यवरांनी ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सुहास सरवदे यांनी केले.
दरम्यान, ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉल्सना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट देत विविध पुस्तकांची खरेदी केली. त्यामुळे ग्रंथप्रेमींचा उत्साह आणि वाचनाविषयीची आवड प्रकर्षाने जाणवली.

Leave a Comment

error: Content is protected !!