
फोटो – तहसिलदार प्रकाश म्हेञे यांना मागण्याचे निवेदन देताना संतोष मोळवणे यांच्यासह शिक्षक.
वाशी,दि.०९ (प्रतिनीधी): जनगणना कामासाठी केवळ शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता इतर सर्व शासकीय विभाग, अनुदानित व खाजगी शिक्षण संस्था तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी यांची समप्रमाणात नियुक्ती करून प्रक्रियेत निर्माण झालेली विषमता दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना जनगणना कामातून पूर्णपणे वगळण्यात यावे, अशीही ठळक मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागण्यांसंदर्भात तालुकाध्यक्ष संतोष मोळवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार प्रकाश म्हेत्रे यांना बुधवार (ता.आठ) रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यात जनगणना कामासाठी बीएलओ व पर्यवेक्षक म्हणून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के नियुक्ती करण्यात आली आहे. इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना मात्र या कामातून सवलत देण्यात आल्याचे दिसून येते. परिणामी, इतर कोणत्याही विभागातील कर्मचारी बीएलओ किंवा पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलेले नाहीत.
सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेतही केवळ शिक्षकांनाच पुन्हा नियुक्त करण्यात येत असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असून त्यामध्ये सर्व विभागांचा सहभाग अपेक्षित असताना केवळ शिक्षण विभागावरच जबाबदारी टाकली जात असल्याची भावना शिक्षक वर्गात निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना समान संधी देऊन कामाचे समतोल वाटप करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिक्षण विभागावर अन्यायकारक व असमान वागणूक दिली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
भारतीय संविधानाच्या कलम १४ नुसार सर्वांना समान वागणूक मिळणे आवश्यक असल्याचा उल्लेख करत प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष संतोष मोळवणे,बाबुराव कोकाटे, कल्याण सुरवसे, राजकुमार गुंजाळ, संघपाल सुकाळे, रणजीत कवडे, बालाजी ठाणे, बाबूराव माने, बाळासाहेब डोरले, शिवशंकर राऊत, श्री ठाकूर, आयुब शेख, सुधीर उंदरे, ज्ञानेश्वर जानगेवाड, अनुराधा देवळे, संगीता भांडवले, उर्मिला भोसले आदी शिक्षकांच्या सह्या आहेत.