अवकाळी पावसाची वाशी परिसरात जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची धावपळ, आंबा-कांदा पिकांना फटका

फोटो : कन्हेरी पाटी ते वाशी रस्त्यावर जोराच्या वाऱ्याने उन्मळून पडलेले झाड.


वाशी, दि. १३ — शहरासह परिसरात बुधवारी दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह जवळपास अर्धातास कोसळलेल्या पावसामुळे कांदा, ज्वारीचा कडबा आणि आंबा बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांनी शेतात पसरून ठेवलेला ज्वारीचा कडबा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच काढणी करून ठेवलेला कांदाही पावसात भिजल्याने उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामातील काही भागांत मळणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना ज्वारीच्या कणसांचे ढिगारे वाचवण्यासाठी ताडपत्री टाकत धावपळ करावी लागली. दरम्यान, जोरदार वाऱ्यामुळे आंबा बागांमधील कच्च्या आंब्यांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली असून बागायतदारांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वादळी वाऱ्याचा तडाखा इतका तीव्र होता की, कन्हेरी पाटी ते वाशी रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीत किरकोळ अडथळे निर्माण झाले.
मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा गारवा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस चिंतेचा ठरला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!