महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त महाविद्यालयात स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान



वाशी, ता. २ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सार्वजनिक उत्सव समिती, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे होते. यावेळी प्रा. डॉ. आनंद करडे, प्रा. शामसुंदर डोके व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नेताजी देसाई उपस्थित होते.
कु. स्नेहल जाधव, कु. गायत्री गायकवाड, कु. कल्पकता महामुनी व कु. विवेकता महामुनी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. कोठावळे म्हणाले, ‘‘अहिंसा व प्रेमाच्या माध्यमातून जग जिंकता येते, हा विचार महात्मा गांधींनी दिला. जीवनात सत्य, अहिंसा व शांतीला महत्त्व असून थोर व्यक्तींच्या विचारांचे आचरण केले पाहिजे. लालबहादूर शास्त्री हे शौर्य व साधेपणाचे प्रतीक होते. प्रत्येकाचे विचार समाजोपयोगी असणे आवश्यक आहे.’’
‘‘स्वयं स्वच्छतेबरोबर सार्वजनिक व सामाजिक स्वच्छतेचीही जाणीव निर्माण झाली पाहिजे. बाह्य स्वच्छतेसोबतच अंतर्मनाची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.
प्रतिमापूजन व व्याख्यानानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद करडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दैवशाला रसाळ यांनी केले, तर प्रा. डॉ. पार्थराज क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. कृष्णा थोरात व प्रा. डॉ. अशोक अलमुनवार यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!