जगदाळे महाविद्यालयात रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

फोटो : रोजगार क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनीषा आडागळे, डॉ. अशोक कदम, डॉ. विश्वास चौधरी, डॉ. महेश गुरमे, डॉ. बालाजी देवकते आदी उपस्थित.

वाशी, दि. २५ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित तीन दिवसीय रोजगार क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील नांदी फाउंडेशनच्या मनीषा आडागळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते.
यावेळी संयोजक प्रा. डॉ. विश्वास चौधरी,गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. डॉ. बालाजी देवकते,प्रा.डाँ.महेश गुरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालय व महिंद्रा प्राइड क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी करून त्यांची रोजगारक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत इंटरव्ह्यू प्रिपरेशन, ग्रुप डिस्कशन तसेच प्रभावी संवाद कौशल्य याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना मनीषा आडागळे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्य, आत्मविश्वास वाढविणे आणि प्रभावी संवाद साधण्याच्या तंत्रांविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी सांगितले की, या कार्यशाळेमुळे आजी-माजी विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगार मिळविण्यास मोठा फायदा होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. विश्वास चौधरी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश गुरमे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बालाजी देवकते यांनी मानले. कार्यशाळेसाठी प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!