वाशी,दि. २४ (प्रतिनिधी): आपत्कालीन मदतीसाठी सुरू असलेल्या डायल ११२ सेवेचा गैरवापर करणाऱ्या एका व्यक्तीवर वाशी पोलिसांनी कठोर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे आपत्कालीन सेवांचा गैरवापर किती गंभीर ठरू शकतो, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. २४) रोजी दुपारी सुमारे ३:३८ वाजता कंट्रोल रूमकडून वाशी तालुक्यातील नांदगाव येथे एका शेतात काही जण नासधूस करत असल्याची माहिती डायल ११२ वरून प्राप्त झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अंमलदार मंगेश नामदेव मिसाळ व चालक तात्काळ शासकीय वाहनाने घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. चौकशीत त्याचे नाव सचिन आश्रुबा शिंदे (वय ३५, रा. नांदगाव) असे समोर आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पुढील चौकशीत त्यानेच खोटी माहिती दिल्याची कबुली दिली.
सचिन शिंदे याने दारूच्या नशेत आपल्या मित्राला घाबरवण्यासाठी आणि केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने डायल ११२ वर खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असून गोंधळ घालत होता. तसेच, पोलिसांशी उद्धटपणे वर्तन करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आपत्कालीन सेवेचा गैरवापर टाळा : पोलिसांचे आवाहन
डायल ११२ ही सेवा नागरिकांना तातडीच्या प्रसंगी मदत मिळावी यासाठी २४ तास कार्यरत आहे. या सेवेचा गैरवापर केल्यास खऱ्या आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.म्हणूनच नागरिकांनी डायल ११२ चा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीतच करावा खोटी माहिती देणे टाळावे तसेच गैरवापर आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे
असे आवाहन वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी केले आहे.