वाशी येथे आजपासून दोन दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सव

(फोटो -प्रतिकात्मक)

एन.डी.नलवडे

वाशी, ता.१४ (संपादक) : वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय “धाराशिव ग्रंथोत्सव” आजपासून सुरू होत आहे. अजिंक्य विद्या मंदिर येथे होणाऱ्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आज सकाळी ११.३० वाजता पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील,आ.प्रा.डॉ. तानाजी सावंत, आ.कैलास पाटील,आ. प्रविण स्वामी, आ.सतीश चव्हाण व आ. विक्रम काळे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथोत्सवाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथून ग्रंथदिंडीने होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली जाणार आहे. दुपारी “वाचनसंस्कृतीची सद्यस्थिती” या विषयावर परिसंवाद, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांचे गुणदर्शन सादर होणार आहे. दिवसभर ग्रंथप्रदर्शन व पुस्तक विक्री सर्वांसाठी खुली राहणार आहे.
रविवारी “राजमाता अहिल्यादेवी होळकर : जीवन व कार्य” या विषयावर विशेष परिसंवाद, दुपारी कवी संमेलन व सायंकाळी समारोप समारंभ होणार आहे. ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाचन संस्कृती समृद्ध करावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमंत ढाकणे यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!