शिक्षणसेवेचा दीपस्तंभ : श्रीधर लिंबाजी पवार (भाऊ) – जिद्द, कष्ट आणि समाजधर्माचा अमृतमहोत्सवी प्रवास

श्री एन.डी.नलवडे
९०२८३३३१४५

मा.श्रीधर (भाऊ) लिंबाजी पवार

वाशी — शेतकरी कुटुंबात १५ फेब्रुवारी १९५१ रोजी जन्म घेतलेले श्रीधर लिंबाजी पवार (भाऊ) यांचे आयुष्य हे शिक्षण, संस्कार आणि समाजधर्म यांचा प्रेरणादायी संगम ठरले आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी बी.एस्सी. व बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि १ जुलै १९७४ रोजी शिक्षक म्हणून सेवाप्रवासास प्रारंभ केला. “शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी गुरुकिल्ली” हा अढळ विश्वास मनात बाळगून त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीत स्वतःला अर्पण केले.
भाऊंची शिक्षक म्हणून कारकीर्द ही केवळ अध्यापनापुरती मर्यादित नव्हती; ती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची व्यापक चळवळ होती. भारत विद्यालय, धाराशिव येथे पाच वर्षे, छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे तब्बल २४ वर्षे त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून कार्य केले. पुढे जनता विद्यालय, येडशी येथे सहा वर्षे आणि महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव येथे एक वर्ष मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी शिस्त, गुणवत्ता आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ घडवला. त्यांच्या कार्यकाळात शाळा ही केवळ ज्ञान देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवणारे संस्कारकेंद्र बनली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये संधी मिळावी, या ध्येयाने भाऊंनी नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल व एन.टी.एस.ई. परीक्षांसाठी मार्गदर्शनाची परंपरा रुजवली. त्यांच्या प्रेरणेतून घडलेले अनेक विद्यार्थी आज प्रशासकीय, शैक्षणिक आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. “विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचे खरे समाधान असते” ही त्यांची धारणा त्यांच्या कार्यातून सातत्याने पाहावयास मिळते.
भाऊंची शिक्षणसेवा ही शाळेच्या चौकटीत मर्यादित न राहता समाज जीवनाशी घट्ट जोडलेली होती. १९७७ साली सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी ‘अजिंक्य क्रीडा मंडळ’ स्थापन केले आणि वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी ‘अजिंक्य वाचनालय’ उभारले. हजारो दर्जेदार पुस्तकांचा संग्रह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत त्यांनी ज्ञानदानाची एक सामाजिक चळवळ उभी केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय ज्ञानाचे खुले विद्यापीठ ठरले.
भाऊंच्या विचारविश्वावर कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी सुरु केलेल्या “एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या ब्रीदवाक्याने सुरु केलेल्य शिक्षण संस्थेचा व मामांच्या कार्याचा खोल प्रभाव आहे. सहकार्य, समाजसेवा आणि शिक्षण यांची सांगड घालत त्यांनी स्वतःचे जीवनच या विचारांचे जिवंत उदाहरण बनवले. साधेपणा, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती अपार माया हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते केवळ शिक्षक राहत नाहीत, तर मार्गदर्शक, पालक आणि प्रेरणास्थान बनतात; म्हणूनच समाजात त्यांना प्रेमाने “भाऊ” ही उपाधी लाभली.
सेवानिवृत्तीनंतर अनेकजण विश्रांतीचा मार्ग निवडतात; मात्र भाऊंसाठी निवृत्ती ही नव्या सेवापर्वाची सुरुवात ठरली. २०११ साली त्यांनी अजिंक्य विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलाची स्थापना करून अंगणवाडीपासून बारावीपर्यंत शिक्षणाची सुसज्ज व्यवस्था उभी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दूरवर पोहोचवला. या संस्थेमुळे प्रामुख्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची शैक्षणिक प्रगती साधली आणि शिक्षणाबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला.
आज त्यांच्या अमृतमहोत्सवी (७५ व्या) वर्षात पदार्पणाच्या पावन क्षणी त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—भाऊंनी पेटवलेला शिक्षणसेवेचा दीप हा केवळ एका शाळा किंवा संस्थेपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाला दिशा देणारा आहे. त्यांनी घडवलेली पिढी हीच त्यांच्या कार्याची खरी शिदोरी आहे. शिक्षण, ग्रंथालय चळवळ आणि सामाजिक बांधिलकी यांद्वारे उभा केलेला त्यांचा आदर्श पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही.
जिद्द, कष्ट, तळमळ आणि समाजधर्म या मूल्यांवर उभ्या राहिलेल्या त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाला कृतज्ञतेचा मानाचा मुजरा! त्यांच्या जीवनकार्याची ही सुवर्णगाथा पुढील पिढ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

Leave a Comment

error: Content is protected !!