वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात नागरिक आक्रमकतांदुळवाडी, महालदारपुरी, शेंडी, जवळका येथील ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; आंदोलनाचा इशारा

फोटो – उपकार्यकारी अभियंता पराग तुरखडे यांना निवेदन देताना केशव सावंत,नागनाथ नाईकवाडी,सुनिल उंदरे,शिवहार स्वामी,सतिश शेरकर आदी.



वाशी, दि. ३ (प्रतिनिधी) : तांदुळवाडी, महालदारपुरी, शेंडी आणि जवळका या गावांमधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून अखंडित वीज सेवा द्यावी, या मागणीसाठी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पराग तुरखडे यांना सोमवार (ता.एक) निवेदन दिले. वीजपुरवठ्याची समस्या त्वरित मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी यावेळी भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत,जिल्हा परिषदशिवसेना गटनेते विकी चव्हाण,वाशी नगर पंचायत शिवसेना गटनेते नागनाथ नाईकवाडी,नगरसेवक शिवहार स्वामी,सरपंच सुनिल उंदरे,
पं.स.उपसभापती नितीन रणदिवे,सतीश शेरकर, पोपट मोरे,भागवत चौधरी, अशोक भराटे, तुकाराम वीर, युवराज येडे, लायक तांबोळी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे गेल्या अनेक दिवसांपासून या चारही गावांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतीसाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही वीज उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तसेच  या भागातील वीजवाहक तारा व वीज खांब जीर्ण व कमकुवत झाल्या असुन हलक्या वाऱ्यातही वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरण यंत्रणेच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित ठेकेदारामार्फत तातडीने वीजवाहिन्या व खांबांची दुरुस्ती करून नागरिकांना अखंडित व पुरेसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.निवेदनावर मोठ्या प्रमाणात शेतक-याच्या सह्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!