

फोटो – सरमकुंडी ता.वाशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा.
वाशी, दि.१७ (बातमीदार) : शाळा बंद असली तरी शिक्षण थांबता कामा नये, या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सरमकुंडी ता. वाशी येथील शिक्षकांनी संपूर्ण उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयांचे विशेष वर्ग घेऊन शिक्षणाचा अनोखा उपक्रम राबविला. शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला मोठी चालना मिळाली असून गावभर या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत २३० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेत दहा शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापक कल्याणराव सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीचा कालावधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयोगात आणला. विशेषतः इंग्रजी संभाषण, शब्दसंग्रह, वाचनकौशल्य तसेच गणितातील मूलभूत संकल्पना दृढ करण्यावर भर देण्यात आला.
ग्रामस्थ, पालक व ग्रामपंचायतीच्या सहकार्यामुळे शाळेचा सर्वांगीण कायापालट झाला आहे. लोकसहभागातून आकर्षक रंगरंगोटी, सुशोभित वर्गखोल्या, शैक्षणिक भित्तीचित्रे, डिजिटल शिक्षण सुविधा आणि हिरवागार परिसर उभारण्यात आला आहे. त्यामुळे शाळा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.
शाळेत डिजिटल शिक्षण, वाचन संस्कृती, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध स्पर्धा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विशेष अध्यापन सातत्याने राबविले जाते. उन्हाळी सुट्टीतील इंग्रजी व गणित वर्गांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी अधिक भक्कम झाली आहे.
याशिवाय वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण केली जात आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे शाळेच्या विकासाला अधिक बळ मिळत आहे.
सरमकुंडी शाळेने लोकसहभाग आणि शिक्षकांच्या समर्पणाच्या बळावर शैक्षणिक प्रगतीचा आदर्श निर्माण केला असून, उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवलेले इंग्रजी व गणिताचे विशेष वर्ग हेच या यशाचे खरे वैशिष्ट्य ठरत आहे.