
वाशी,ता.१२ (प्रतिनिधी) पारा जि.प. गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या आश्विनी सुनिल उंदरे यांचा माजी सार्वजनिक कुटुंब व आरोग्य मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी (ता.११) पुणे येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी वाशी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना गटनेते नागनाथ नाईकवाडी, भूम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब हाडोग्रीकर, शिवसेना तालुका संघटक तथा नगरसेवक शिवहार स्वामी, सरपंच सुनिल उंदरे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात शिवसेनेला मिळालेले यश हे आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या भक्कम नेतृत्वाचे फलित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या पाठबळावर कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवली. उमेदवार व कार्यकर्त्यांनी गावोगावी संपर्क साधत ग्रामीण भागात आ.प्रा.डाँ.सावंत यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मतदानाचे आवाहन केले.
आ.सावंत यांनी तेरखेडा, पारा व पारगाव येथे जाहीर सभा घेऊन पक्ष उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारा, पारगाव आणि तेरखेडा या तिन्ही गटांत शिवसेनेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी केले. पंचायत समितीच्या सहा गणांपैकी पारा, बावी, तेरखेडा, इंदापूर आणि सरमकुंडी या पाच गणांत शिवसेनेने विजय मिळवला, सामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देण्याचा सावंत यांचा निर्णयही विजयासाठी निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.