नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी): सन २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित, पशुधन व वित्तीय हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत व्यापक जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या अनुषंगाने नियोजन, पूर्वतयारी, उपाययोजना व बचावकार्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांच्या सहभागातून हे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तेरखेडा ता.वाशी येथे अचानक आग लागल्यास अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार असुन दुपारी तीन वाजता जानकापुर ता.वाशी येथे  पूरस्थितीत अडकलेल्या व्यक्ती व पशुधन यांना बोटीच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये संबंधित गावांतील ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील, आपदा मित्र तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार असून आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांनाही सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. पूर, तलाव, नद्या, अतिवृष्टी, भूकंप प्रवण क्षेत्र तसेच इतर मानवनिर्मित आपत्तींच्या संदर्भात आवश्यक खबरदारी, तत्काळ प्रतिसाद व बचाव कार्यपद्धती यांची माहिती दिली जाणार आहे.
प्रशिक्षणानंतर त्याच दिवशी सकाळी ११ वाजता तेरखेडा व दुपारी तीन वाजता जानकापुर येथे नैसर्गिक आपत्ती संदर्भात व्यापक जनजागृती कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.या पाश्वभुमीवर तालुक्यातील सर्व नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती व उपाययोजनांबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आयोजित या जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार प्रकाश म्हेञे यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!