धाराशिव–बीड राष्ट्रीय महामार्गावर दिवसा पवनचक्कीच्या अवजड पात्यांची वाहतूक; नागरिकांकडून निर्बंधांची मागणी

फोटो : राष्ट्रीय महामार्गावर दिवसा पवनचक्कीच्या पात्याची वाहतूक होत असताना.


वाशी, दि.२७ (प्रतिनिधी) : धाराशिव–बीड राष्ट्रीय महामार्गावर सध्या पवनचक्की प्रकल्पांसाठी लागणाऱ्या अवजड पात्यांची (ब्लेड) दिवसा वाहतूक होत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिक व वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रचंड लांबी व रुंदीची ही पाते दिवसा वाहून नेली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी वळणांवर मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागतात, तर अनेकदा ओव्हरटेक करणे धोकादायक ठरत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवसा अशा अवजड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
वाशी तालुका परिसरात विविध ठिकाणी पवनचक्की उभारणीची कामे सुरू असून मोठ्या ट्रेलरद्वारे पात्यांची ने-आण सातत्याने होत आहे. ही पाते अत्यंत लांब असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना महामार्गावर अडथळा निर्माण होतो, अशी चर्चा आहे. तसेच वाशी फाटा परिसरात सर्व्हिस रस्त्यावर पवनचक्कीची पाती असलेली अवजड वाहने दिवसभर उभी असल्याचेही वारंवार दिसून येते.
दिवसा अशा वाहतुकीमुळे काही वेळा महामार्गावरील वाहतूक मंदावते, तर अचानक वळण घेताना ट्रेलरमुळे दोन्ही बाजूंना कोंडी निर्माण होते. परिणामी अपघाताचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य नियमन करावे, अशी मागणी होत आहे.
………..
कोट
“भल्यामोठ्या पवनचक्कीच्या पात्यांची दिवसा वाहतूक होत असल्याने ओव्हरटेक करणे धोकादायक ठरते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. ही वाहतूक रात्री किंवा कमी गर्दीच्या वेळीच करणे आवश्यक आहे.”
— दिलीप पवार, वाहनचालक
…….
कोट
“महामार्ग प्रशासन व वाहतूक पोलिसांनी अवजड पात्यांची वाहतूक प्रामुख्याने रात्रीच्या वेळेतच करण्याचे नियमन करावे. संबंधित पवनचक्की कंपन्यांना दिवसा वाहतूक टाळण्याच्या सूचना देण्याची गरज आहे.”
— पांडुरंग घुले वाशी

Leave a Comment

error: Content is protected !!