
एन.डी.नलवडे
वाशी,दि.०१ (प्रतिनिधी) : विज्ञानाचा प्रचार-प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन २०२५-२६ चा सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार येथील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या सहशिक्षिका पुनम गौतम चेडे यांना जाहीर झाला आहे. वाशी तालुक्यातून हा मान पटकावल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे सन २०२४-२५ पासून हा पुरस्कार उपक्रम राबविण्यात येत असून विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील भरीव योगदान, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग तसेच शाळेतील विविध उपक्रम व स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी या निकषांवर शिक्षकांची निवड केली जाते. या सर्व निकषांवर उत्तम कामगिरी करत पुनम चेडे यांनी यावर्षीच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.
जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यशाबद्दल त्यांनी पुनम चेडे यांना विशेष शुभेच्छा देत पुढील वाटचालीस प्रेरणा दिली. तसेच या पुरस्कारासाठी तालुकाध्यक्ष सुनील क्षीरसागर यांचे योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठपुरावा लाभल्याचेही सांगितले जात आहे.
पुनम चेडे यांच्या या उल्लेखनीय गौरवाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, या जिल्हास्तरीय पुरस्काराचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण सोहळा आगामी एप्रिल महिन्यात परंडा येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून, या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुनम चेडे यांचा सत्कार होणार आहे.