
फोटो – अंकुरम विद्यामंदिरयेथे विज्ञान प्रदर्शनामध्ये प्योगाचे सादरीकरण करताना विद्यार्थी.
एन.डी.नलवडे
वाशी, दि. ०२ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शिवाजी ज्ञान विहार शिक्षण मंडळ संचलित अंकुरम विद्या मंदिर येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पूर्व प्राथमिक ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या एकूण २५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तब्बल २१२ वैज्ञानिक प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण, ऊर्जा, आरोग्य, तंत्रज्ञान, शेती व जलसंवर्धन या विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांनीही सर्जनशीलता आणि वैज्ञानिक विचारसरणीचे दर्शन घडवत उत्कृष्ट प्रयोग मांडले.


विज्ञान प्रदर्शनाचे मूल्यमापन करण्यासाठी कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथील डॉ. अशोक हुंबे, डॉ. महेश गुरमे व प्रा. बलवान कांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक करत वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी पंचायत समिती वाशीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) सुधाकर कोल्हे व केंद्रप्रमुख कैलास चौधरी यांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार नवनाथ टकले, दादासाहेब लगाडे,शोएब काझी यांचीही उपस्थिती लाभली.
या विज्ञान प्रदर्शनास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहिले व त्यांचे मनापासून कौतुक केले. पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षिका शबनम काझी, समन्वयक मीनाक्षी जाधव, गंगा पवार व सर्व शिक्षकांनी केले. आयोजनासाठी संचालक राजेश आवटे व मुख्याध्यापक सोमनाथ स्वामी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा व संशोधनवृत्ती अधिक बळकट होण्यास मदत झाली असून विज्ञान शिक्षणाबाबतची आवड लक्षणीयरीत्या वाढल्याचे समाधान शिक्षकांनी व्यक्त केले.