पारगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; २३ गरजूंना सामाजिक सहाय्य योजनेचा लाभ

फोटो- पारगाव ता.वाशी येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’प्रसंगी उपस्थीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,तहसिलदार प्रकाश म्हेञे यांच्यासह अधिकारी.

वाशी,दि.०७ (प्रतिनिधी): तालुक्यातील पारगाव ता.वाशी येथे शनिवार (ता.७) रोजी महसूल प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘महाराजस्व समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांनी नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात महसूल विभागासह पंचायत समिती, महिला व बालविकास विभाग, नोंदणी विभाग, पोस्ट विभाग, आपले सरकार सेवा केंद्र तसेच तालुका आरोग्य विभागाचे पथक सहभागी झाले होते. पारगाव मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये नागरिकांना रेशन कार्डसंबंधी ई-केवायसी पूर्ण करणे, नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून देणे, नाव कमी-जास्त करणे, संजय गांधी सामाजिक सहाय्य योजना अंतर्गत लाभ मंजूर करणे, सातबारा पत्रकावरील दुरुस्त्या, Agristack अंतर्गत नोंदणी, आधार कार्ड काढणे व नाव दुरुस्ती आदी सेवा देण्यात आल्या.
शिबिराच्या सुरुवातीला तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील महत्त्वपूर्ण निर्णयांबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये अकृषिक परवानगी रद्द होणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना तसेच तुकडेबंदी संदर्भातील दुरुस्ती याबाबत माहिती देण्यात आली.
दरम्यान, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर व उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
या कार्यक्रमास सनियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, महिला व बालविकास अधिकारी भारती, तालुका आरोग्य अधिकारी महिंद्रकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख बेहेरे, दुय्यम निबंधक आरती नागरगोजे, नायब तहसीलदार पूजा पाटील, श्रीकिसन सांगळे, डी. जी. शिंदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी राठोड आदी उपस्थित होते.
२३ गरजूंना सामाजिक सहाय्य योजनेचा लाभ
या शिबिरात विशेषतः संजय गांधी सामाजिक सहाय्य योजना अंतर्गत २३ गरजू लाभार्थ्यांना मंजुरी देऊन त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी पारगाव मंडळ अधिकारी निळकंठ केदार तसेच मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!