कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानमाला; विजोरा येथे समारोप

फोटो  – विजोरा ता.वाशी येथे कर्मवीर व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी श्री खोसे,प्रा.शाम डोके,प्रा.डाँ.दैवशाला रसाळ,प्रा.आश्विनी नवले,प्रा.अजित तिकटे आदी.


वाशी,ता.०८ (बातमीदार) : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांच्या वतीने वाशी व भूम तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान, या व्याख्यानमालेचा समारोप विजोरा (ता. वाशी) येथील विद्या विकास विद्यालयात शनिवारी (ता. ७) रोजी २९ व्या व्याख्यानाने करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खोसे, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. शाम डोके,प्रा. डॉ. दैवशाला रसाळ, प्रा. डॉ. आश्विनी नवले, प्रा. अजित तिकटे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या नियोजनातून प्राध्यापकांच्या आठ पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पथकांनी वाशी व भूम तालुक्यातील एकूण २९ शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले.
या व्याख्यानमालेतून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा देणे, समाजात प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी परिश्रम, शिस्त आणि ध्येय निश्चिती यांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच उच्च शिक्षण घेतल्यास करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता वाढली असून अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनीही स्वागत केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!