वाशी पोलिसांची धडक कारवाई : दरोड्याच्या तयारीत असलेल्या शस्त्रास्त्रांसह एक जण अटकेत तर चौघे फरार

फोटो – दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले.

एन.डी.नलवडे
वाशी,दि.१२ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील पारगाव टोल नाका परिसरातील शेंडी ता.वाशी शिवारात  दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीवर वाशी पोलिसांनी धडक कारवाई करत एक सराईत गुन्हेगाराला अटक केली. तर त्याचे चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार, कोयता, कत्ती यांसारखी घातक शस्त्रे तसेच मिरची पूड व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,गुरुवार ता.११ रोजी सायंकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास कमळेश्वर पिंपळगाव पारधी पेढीकडे जाणाऱ्या मार्गावर काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत हत्यारांसह दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती वाशी पोलिसांना मिळाली. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) अनिल चोरमले यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच पाच इसम संशयास्पदरीत्या बसलेले दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी आपली वाहने तेथेच सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला.माञ पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून बबन रंगनाथ शिंदे (रा. पारा, ता. वाशी) याला ताब्यात घेतले, तर इतर चार जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार तलवार, एक कोयता, एक कत्ती, मिरची पूड तसेच दोन दुचाकी जप्त केल्या. प्राथमिक तपासात फरार आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यामध्ये लहू आबा शिंदे, तानाजी अशोक काळे, सोनू बबन शिंदे आणि सुभाष शिवाजी शिंदे (सर्व रा. पारा, ता. वाशी) यांचा समावेश आहे.या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार बाबा जाधवर, बळीराम यादव, किरण शेवाळे, नसीर सय्यद, गणेश नरवडे, विठ्ठल मलंगनेर, चालक शिवा कोर्डे तसेच होमगार्ड नाना वीर आणि आकाश शिंदे यांनी पार पाडली.

Leave a Comment

error: Content is protected !!