
वाशी, दि.१४ (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना नेतृत्वाच्या पातळीपर्यंत घेऊन जाण्याची परंपरा शिवसेनेची राहिली असून हीच परंपरा माजी आरोग्यमंत्री तथा वाशी-भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत पुढे नेत असल्याचे मत धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते संदेश उर्फ विकी चव्हाण यांनी व्यक्त केले.
शिवसेना ही स्थापनेपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखली जाते. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार, मंत्रीपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. हीच परंपरा पुढे नेत शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यकर्त्यांना संधी देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवासही सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेल्या बळाचे उदाहरण मानला जातो.
या विचारधारेतून प्रेरणा घेत आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील विविध निवडणुकांमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर देत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राजकारणातील अनुभव, मोठेपणा किंवा राजकीय पार्श्वभूमी यापेक्षा सर्वसामान्यांच्या कामासाठी धावणारा, पक्षाशी निष्ठा ठेवणारा आणि गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा कार्यकर्ता निवडून देण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
याचे उदाहरण म्हणून त्यांनी स्वतःचा उल्लेख करताना सांगितले की, “मी यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूकही लढवली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सावंत यांनी तेरखेडा जिल्हा परिषद गटातून मला उमेदवारी दिली. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी निवडून आलो आणि जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदाची जबाबदारीही मिळाली.”
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आज जिल्ह्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण होण्यामागे शिवसेना पक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील काळात पक्षाच्या विचारांनुसार सर्वसामान्य आणि गरजवंतांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी या भावना व्यक्त करत नेते घडविण्याची क्षमता असलेल्या या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.