
वाशी, दि. २७ (प्रतिनिधी) : घटपिंपरी ता.वाशी येथील न्यू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी (एस.एस.सी.) बॅच २०००–२००१ मधील माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा व शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, घाटपिंपरी संचलित या शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.ए.आवारे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. ए. आवारे यांच्यासह बी. बी. निरपळ, जी. एस. गलांडे, बी. बी. खोसे, डी. एस. सातपुते, डी. बी. माने, जी. टी. जगताप, ए. आर. गलांडे, व्ही. एन. मोरे,व्ही.व्ही. कबीर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुण अभिवादन करण्यात आले.
स्नेहमेळाव्याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. कुशावर्ता पवार, बालाजी मोटे, सुधीर सातपुते, बानू गायकवाड यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.तसेच ईतर विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून देत शालेय अनुभव, आठवणी आणि आपल्या यशोगाथा व्यक्त केल्या. अनेक वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण भावनिक झाले.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी पाच व्हाईट बोर्ड भेट देण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल आवारे, संतोष इंगोले, अशोक पालकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
“ही शाळा केवळ शिक्षणाचे ठिकाण नसून एक कुटुंब आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. जुन्या आठवणी, मित्रमैत्रिणींची भेट आणि गुरुजनांचा सन्मान यामुळे स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला. शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. तब्बल २५ वर्षांनंतर झालेला हा स्नेहमेळावा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व भावनिक ठरला.
सूत्रसंचालन सुधीर सातपुते,बानू गायकवाड यांनी केले.