
फोटो – ऋतुजा जाधव हिच्या नागरी सत्कार कार्यक्रम प्रसंगी विकी चव्हाण,नागनाथ नाईकवाडी,शरद वाठोरे,शिवहार स्वामी,प्रविण गायकवाड,प्रसाद जोशी आदी.
वाशी,दि.१३ (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर येथील ऋतुजा जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत ‘सहाय्यक विक्रीकर आयुक्त’ (ACST) या वर्ग-१ पदावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, सलग पाचव्यांदा स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत तिने आपल्या कर्तृत्वाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. तिच्या या यशाबद्दल रविवार (ता. १२) रोजी शहरात नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण, नगर पंचायत शिवसेना गटनेते नागनाथ नाईकवाडी,भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी शरद वाठोरे,माजी उनगराध्यक्ष प्रसाद जोशी,नगरसेवक शिवहार स्वामी,प्रविण गायकवाड,सिध्देश्वर भालेकर,धिरज भगत,सयाजी नाईकवाडी,आक्का उद्योग समुहाचे किशोर माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यापूर्वी तिने उपशिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक, राज्य विक्रीकर निरीक्षक,तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांवर निवड मिळवली होती. आता सहाय्यक विक्रीकर आयुक्त या प्रतिष्ठित वर्ग-१ पदावर निवड होऊन तिच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे चीज झाले आहे.
सध्या ऋतुजा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील जलसंपदा विभागात ‘सहाय्यक विभाग अधिकारी’ म्हणून कार्यरत आहे.
ऋतुजा हिचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालयात पूर्ण झाले. अकरावी-बारावीचे शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात झाले. पुढे तिने रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.तिचे वडील प्रा.राम जाधव हे कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातून सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले असून आई सावित्री जाधव या गृहिणी आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून त्यांनी ऋतुजाला नेहमीच प्रोत्साहन दिले.
तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुटुंबीय, शिक्षक व मार्गदर्शकांनी तिच्या कर्तृत्वाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “ऋतुजाने आमच्या कष्टाचे चीज केले असून तिच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.