
फोटो – १९९३ बँचच्या स्नेह मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी.
एन.डी.नलवडे
वाशी,दि.१९ (संपादक) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातून सन १९९३ साली इयत्ता दहावीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३३ वर्षांनंतर स्नेहमेळावा रविवार ता.१७ उत्साहात शहरातील अन्नपुर्णा मंगल कार्यालयात पार पडला. स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी व तत्कालीन शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सुमारे तीन दशकांनंतर एकमेकांना भेटण्याचा योग आल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना शालेय जीवनातील विविध प्रसंग, अभ्यासातील गंमती-जमती, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा अनेकांनी भावनिक स्वरूपात उल्लेख केला.
या स्नेहमेळाव्यास एकूण ११७ माजी विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यावेळचे १६ शिक्षकही कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. स्नेहमेळाव्यात सहभागी सर्व विद्यार्थी , शिक्षकांना स्मृतिचिन्ह म्हणून ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. यावेळी १९९३ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांची माहिती असलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक उपक्रम, गप्पा-गोष्टी, समूह छायाचित्रण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी जुन्या वर्गमित्रांना ओळखताना सुरुवातीला अडचण आल्याच्या आठवणींनाही उजाळा दिला.काही विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी सांगताना भावुक होत जुन्या मैत्रीचे नाते कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहरातील माजी विद्यार्थ्यांच्या समितीने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल क्षिरसागर यांनी केले.सुञसंचलन शिवशंकर राऊत,अफसाना पठाण यांनी तर आभार हनुमंत क्षिरसागर यांनी मानले.
स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यानी केवळ जुन्या आठवणींनाच उजाळा दिला नाही, तर शाळेप्रती असलेली आपुलकी आणि कृतज्ञताही कृतीतून व्यक्त केली. शाळेच्या गरजा लक्षात घेऊन माजी विद्यार्थी धनंजय कुलकर्णी यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात वीज खंडित झाल्याने अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी इन्व्हर्टर, बॅटरी व संपूर्ण लाईट फिटिंग संच शाळेला भेट दिला.तसेच अर्जुन धन्ने यांच्या वतीने शाळेसाठी १० सिलिंग फॅन देण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीपूर्ण उपक्रमाचे गुरुजनांसह उपस्थितांनी विशेष कौतुक केले. जुन्या विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.


तीन दशकांनंतर एकत्र आलेल्या मित्र मैत्रिणींच्या स्नेहमेळाव्याची सांगता अखेर ‘झिंग झिंग झिंगाट’ या लोकप्रिय गीताच्या जल्लोषमय वातावरणात झाली. जुन्या आठवणींना उजाळा देत, सर्व माजी विद्याथ्र्यानी एकत्रितपणे नृत्याचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण उत्साहाने भारावून गेले.‘झिंगाट’च्या तालावर विद्यार्थ्यांनी फेर धरत ठेका धरला आणि संपूर्ण सभागृहात आनंद, उत्साह व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
या जल्लोषपूर्ण वातावरणात “पुन्हा भेटू या” असा निर्धार व्यक्त करत स्नेहमेळाव्याची भावनिक आणि अविस्मरणीय सांगता करण्यात आली.
