
फोटो – प्राचार्य,मार्गदर्शक शिक्षक यांच्या समवेत विविध क्रिडा स्पर्धेत यश मिळवलेले अंकुरम विद्या मंदिरचे विद्यार्थी.
वाशी, दि.१ (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत अंकुरम विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, योगासन आणि मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
१४ वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत अंकुरम विद्या मंदिरच्या मुलांच्या तसेच मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघानेही प्रथम क्रमांक पटकाविला.
बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात अनिमेश नाईकवाडी, तर १४ वर्षे वयोगटात अजिंक्य मेदने यांनी प्रथम क्रमांक मिळविला. १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात स्वरा शिंदे हिने द्वितीय, तर तन्वी गायकवाड हिने तृतीय क्रमांक मिळविला.
योगासनाच्या १४ वर्षे वयोगटातील ट्रॅडिशनल योगा आणि आर्टिस्टिक योगा या दोन्ही प्रकारांत श्री बामणे हिने प्रथम क्रमांक मिळविला.
मैदानी स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गोळाफेकमध्ये कल्याणी सातपुते हिने प्रथम, तर हिंदवी रिटे हिने तृतीय क्रमांक मिळविला. थाळीफेकमध्ये हिंदवी रिटे हिने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगटातील थाळीफेकमध्ये श्रावणी गायकवाड हिने तृतीय, तर भालाफेकमध्ये शुभम डोईफोडे याने तृतीय क्रमांक मिळविला.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारे तसेच पात्र ठरलेले विद्यार्थी व संघांची धाराशिव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक राजेश आवटे, प्राचार्य डॉ. एम. शिवनाथन, क्रीडा शिक्षक शशिकांत पवार व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद पवार, संचालक, प्राचार्य, शिक्षक व पालकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.