
फोटो – विस्तार केंद्र व अळिंबी लागवड प्रयोगशाळेच्या उदघाटण प्रसंगी उपस्थीत मान्यवर.
वाशी, दि. १ (प्रतिनिधी) : पदवीचे प्रमाणपत्र घेऊन नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा शिक्षणासोबतच कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न बनता ज्ञान व कौशल्याच्या बळावर स्वयंरोजगार उभारून इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. अश्विन रांजणीकर यांनी केले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागासह महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या विस्तार केंद्र व अळिंबी लागवड प्रयोगशाळेचे उद्घाटन डॉ. रांजणीकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. ३१) झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे होते.
यावेळी अळिंबी लागवड तंत्रज्ञ व प्रगतशील शेतकरी किसनराव खरवडे, कार्यक्रमाधिकारी प्रा. शामसुंदर डोके, कोर्स समन्वयक प्रा. सूरज कावरे, प्रा. डॉ. दैवशाला रसाळ आदी उपस्थित होते.
डॉ. रांजणीकर म्हणाले, की बदलत्या काळात पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावहारिक व कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अळिंबी लागवडीसारखे कमी जागेत व तुलनेने कमी भांडवलात सुरू करता येणारे उपक्रम स्वयंरोजगाराचे प्रभावी माध्यम ठरू शकतात. विस्तार केंद्रातून विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम, प्रशिक्षण व कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाची संधी मिळणार आहे.
प्राचार्य डॉ. कोठावळे म्हणाले, की शेतकरी हा केवळ उत्पादक नसून संशोधकही आहे. प्रत्यक्ष अनुभवातून विकसित झालेले त्यांचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती जिद्द, सातत्य व कठोर परिश्रमांच्या बळावर साकार करावीत. अळिंबी लागवड प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यवसायाची जोड देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. शामसुंदर डोके यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. जयप्रकाश चोरघडे यांनी, तर आभार प्रा. डॉ. महेश गुरमे यांनी मानले.