तालुक्यावर शिवसेनेचा ठसा; जि.प.–पं.स. निवडणुकीत एकहाती सत्ता

वाशी (प्रतिनिधी):
तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय चित्र पूर्णतः बदलले असून, शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेच्या तिन्ही गटांवर शिवसेनेचा भगवा फडकला, तर पंचायत समितीतील सहा गणांपैकी पाच गण शिवसेनेच्या ताब्यात गेल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद पारगाव गटात शिवसेनेच्या सविता विकास तळेकर यांनी ६,७९८ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली रवी भैरट (५,०७१) यांचा पराभव केला. तेरखेडा गटात शिवसेनेचे संदेश ऊर्फ विकी सोमनाथ चव्हाण यांनी ७,५९३ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे बिभीषण ज्ञानोबा खामकर (६,९६१) यांच्यावर मात केली. पारा गटात शिवसेनेच्या आश्विनी सुनिल उंदरे यांनी ५,५८० मते मिळवत भाजपच्या रूपाली सुजित लोकरे (३,३९४) यांचा स्पष्ट पराभव केला.
पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेची सरशी कायम राहिली. सरमकुंडी गणात प्रणिता प्रविण गायकवाड यांनी ४,३५६ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता नामदेव गायकवाड (२,५८२) यांना पराभूत केले. पारा गणात अशोक रामदास भराटे (२,५०५) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सतिश घरत (२,२६३) यांच्यावर विजय मिळवला. बावी गणात नितीन शिवाजी रणदिवे (२,७९३) यांनी भाजपचे संजय मच्छिंद्र शिंदे (२,०२६) यांचा पराभव केला. तेरखेडा गणात पूनम बालाजी घोलप (४,३१६) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला दिलीप घोलप (३,७६५) यांच्यावर मात केली, तर इंदापूर गणात अरुणा रावसाहेब शिंदे (३,७३४) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सचिन शिंदे (२,६८५) यांचा पराभव केला.
दरम्यान, पारगाव गणात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोमल प्रदीप मोटे यांनी २,९५७ मते मिळवत शिवसेनेच्या निर्मला लक्ष्मण लाखे (२,८२०) यांचा अल्प फरकाने पराभव केला.
या निकालांमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः शिवसेनेच्या बाजूने झुकली असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयानंतर शिवसेना पदाधिकारी व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. आगामी काळात तालुक्याच्या विकासावर या निकालाचा ठसा उमटण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!