दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

फोटो : गोलेगाव (ता. वाशी) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करताना मान्यवर.


वाशी,दि. २४ (प्रतिनिधी) : दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त रूढी-परंपरेला छेद देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम पाटील कुटुंबीयांच्या वतीने राबविण्यात आला. गोलेगाव (ता. वाशी) येथील जिल्हा परिषद शाळेतील ७० विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. २२) स्कूल बॅगचे मोफत वाटप करण्यात आले.
पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासात हातभार लागावा, हा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या उपलब्धतेसाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसारखी आवश्यक वस्तू मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक गरजा काही प्रमाणात पूर्ण होण्यास मदत होणार आहे. स्कूल बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. पाटील कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. उल्हास पाटील, पौर्णिमा पाटील, सुचिता पाटील, साक्षी पाटील, संजीवन कागदे, मुख्याध्यापक एस. यू. पवार, सहशिक्षिका यू. एम. चव्हाण, एस. पी. जगताप आदी उपस्थित होते. शाळेच्या वतीने पाटील कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!