राष्ट्रवादीचे संतोष पवार यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’;माजी मंत्री,आमदार प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश.

फोटो : पुणे येथे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत संतोष पवार यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


वाशी, दि. २९ (प्रतिनिधी) : तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी घडामोड बुधवारी ता.२९ घडली. माजी आ. राहुल मोटे यांचे विश्वासू सहकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संतोष पवार यांनी समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पुणे येथे माजी मंत्री तथा आमदार प्रा.डाँ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पवार यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यावेळी आमदार प्रा.डाँ.तानाजी सावंत यांनी संतोष पवार यांचा सत्कार करून शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी नगरपंचायत शिवसेना गटनेते नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक शिवहार स्वामी, सरपंच सुनील उंदरे, माजी युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, शहरप्रमुख सतीश शेरकर, धर्मराज जगताप, प्रकाश शेटे, हर्षल उंदरे, शशिकांत उंदरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष पवार हे माजी आमदार राहुल मोटे यांचे निकटवर्तीय म्हणून दीर्घकाळ ओळखले जात होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी तालुकाभर संघटन मजबूत करण्याचे काम केले असून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे.
संतोष पवार यांच्या कुटुंबाचीही तालुक्यातील राजकारणात प्रभावी ओळख आहे. त्यांचे वडील वाशीचे सरपंच तसेच भूम पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत, तर त्यांच्या पत्नी नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रभाव लक्षात घेता त्यांच्या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पक्षप्रवेशानंतर तालुक्यातील विविध राजकीय गटांमध्ये चर्चांना उधाण आले असून, पवार यांच्या पाठोपाठ आणखी काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी संघटनात्मक बळकटी देणारा ठरू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!