राखीच्या धाग्यातून वृक्षरक्षणाचा संकल्प; जगदाळे महाविद्यालयात ‘वृक्ष रक्षाबंधन’


फोटो : ‘वृक्ष रक्षाबंधन’ उपक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे, प्राध्यापक व विद्यार्थी.


वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि रक्षणाच्या वचनाचे प्रतीक नसून निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणाही आहे, हा संदेश देत येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात शुक्रवारी (ता. २८) आगळावेगळा ‘वृक्ष रक्षाबंधन’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. महाविद्यालय परिसरातील वृक्षांना राख्या बांधून त्यांचे संरक्षण, संवर्धन व संगोपन करण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.
रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण, घटते वनक्षेत्र आणि बदलते पर्यावरणीय संतुलन या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रशिक्षक विक्रांत चव्हाण, प्रा. डॉ. विश्वास चौधरी, प्रा. डॉ. नेताजी देसाई, प्रा. डॉ. अनंत पाटील, प्रा. डॉ. दैवशाला रसाळ, प्रा. सुनिता डोके, प्रा. डॉ. आश्विनी नवले, प्रा. डॉ. चेतना जगताप, प्रा. सारिका गादेकर यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधत वृक्षसंवर्धनाचा संदेश कृतीतून दिला. यावेळी प्राचार्य डॉ. कोठावळे यांनी उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची शपथ दिली.
ते म्हणाले, ‘‘वृक्ष हे केवळ निसर्गाचे घटक नसून मानवी जीवनाचे आधारस्तंभ आहेत. ते आपल्याला प्राणवायू देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात आणि भावी पिढीचे जीवन सुरक्षित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यामुळे वृक्षांना केवळ राखी बांधून आपली जबाबदारी संपत नाही; तर त्यांच्या संरक्षणाची व संगोपनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.’’
प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले. राखीचा धागा हा प्रेमासोबतच रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे प्रतीक आहे. हाच रक्षणाचा संकल्प वृक्षांसाठीही कृतीतून व्यक्त व्हावा आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, असा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शामसुंदर डोके यांनी केले, तर प्रा. महादेव उंदरे यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!