
फोटो : घाटपिंपरी (ता. वाशी) शिवारातील डोंगराळ भागात गायीची शिकार केल्यानंतर घटनास्थळी आढळलेले वाघाचे ठसे.
वाशी, दि. ३० : घाटपिंपरी (ता. वाशी) येथील शिवारातील वन विभागाच्या राखीव वनालगतच्या डोंगराळ भागात वाघाचा वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. भरदिवसा गायीची शिकार करून तिचे धड तब्बल २०० मीटर अंतर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २८) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. शनिवारी वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता आढळलेल्या पाऊलखुणा प्राथमिक तपासात वाघाच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटपिंपरी येथील शेतकरी भरत निकत यांनी शुक्रवारी आपली जनावरे चारण्यासाठी सोडली होती. गावाच्या शिवारातील राखीव वनालगतच्या डोंगराळ भागात जनावरे चरत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने एका गायीवर अचानक झडप घातली. निकत यांच्या डोळ्यांसमोरच वाघाने गायीची शिकार केली. त्यानंतर गायीचे धड सुमारे २०० मीटर अंतर फरफटत नेल्याचे सांगण्यात आले.
आरडाओरड, दगडफेक… अन् दुसऱ्या गायीचे प्राण वाचले!
एका गायीची शिकार केल्यानंतर वाघाने परिसरातील दुसऱ्या गायीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरत निकत यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने वाघाच्या दिशेने दगडफेक केली आणि मोठ्याने आरडाओरड सुरू केली. काही वेळ वाघाने निकत यांच्या दिशेनेही आक्रमकपणे येण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी धीर न सोडता प्रतिकार सुरू ठेवल्याने वाघाने अखेर राखीव वनाच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे दुसऱ्या गायीचे प्राण वाचले.
घाटनांदूर (ता. भूम) येथून सुरू होणारे वन विभागाचे राखीव वन घाटपिंपरी आणि यसवंडी (ता. वाशी) परिसरापर्यंत विस्तारलेले आहे. या वनालगत मोठ्या प्रमाणावर शेती आणि पशुपालन केले जाते. त्यामुळे वाघाच्या हालचाली वाढल्याने डोंगराळ भागातील शेतकरी व पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
जनावरे चारायची कुठे? शेतात एकट्याने जायचे कसे? असा प्रश्न आता परिसरातील नागरिक विचारत आहेत. दुभती गाय किंवा अन्य जनावर वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दगावल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वन विभागाने केवळ पाहणी न करता वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीही या परिसरात वन्यप्राण्यांकडून जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. यंदा पुन्हा भरदिवसा गायीची शिकार झाल्याने भीती आणखी वाढली आहे.
……………………………………
वन विभागाचे आवाहन
“घाटपिंपरी शिवारातील डोंगराळ भागात वन्यप्राण्याच्या पाऊलखुणा आढळल्या असून, प्राथमिक तपासात त्या वाघाच्या असल्याचे दिसून आले आहे. नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी शेतात तसेच डोंगराळ परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी. शक्यतो एकट्याने न जाता समूहाने जावे.”
— एस. एस. जगताप, वनरक्षक