शिष्यवृत्ती परीक्षेत अजिंक्य विद्यामंदिरचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक


श्रीकांत दळवे

                                अर्णव भाकरे

वाशी, दि. ४ (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, वाशी येथील अजिंक्य विद्यामंदिर शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी शहरी विभागातून शिष्यवृत्ती मिळवत शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत श्रीकांत प्रविण दळवे आणि अर्णव ईश्वर भाकरे यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळविला. नियमित अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि शिक्षकांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले. या निकालामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही समाधानाचे वातावरण असून, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या विद्यार्थ्यांना शिक्षिका शिवकांता चौधरी, सोनाली कवडे, रागिणी चेडे आणि रेश्मा ढेंगळे यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विशेष सराव, नियमित चाचण्या आणि वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव एस. एल. पवार आणि प्राचार्य लक्ष्मीकांत पवार यांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. भविष्यातही शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळवावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजिंक्य विद्यामंदिरने गेल्या काही वर्षांत शैक्षणिक, सांस्कृतिक व स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून, यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची साक्ष देणारे ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!