
फोटो – हिंदवी चौरे
वाशी, दि. ०६ (प्रतिनिधी): योगासन क्रीडा क्षेत्रात वाशीची कन्या हिंदवी परमेश्वर चौरे हिने उल्लेखनीय यश संपादन करत ‘टीम इंडिया’मध्ये आपली निवड पक्की केली आहे. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान अहमदाबाद (गुजरात) येथील ट्रान्सस्टेडिया येथे होणाऱ्या पहिल्या वर्ल्ड योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाल्याने वाशी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१४ वर्षांखालील गटात हरियाणा राज्यातील सोनीपत येथे झालेल्या जागतिक योगासन निवड चाचणीत हिंदवीने प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय संघात निवड निश्चित झाली असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
लहानपणापासूनच योगासनाची आवड जोपासणाऱ्या हिंदवीने कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षकवर्ग तसेच संपूर्ण वाशीकरांचा उर अभिमानाने भरून आला आहे. यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उज्वल कामगिरी करत तिने आपली क्षमता अधोरेखित केली आहे.
“हिंदवीची मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास पाहता ती जागतिक स्पर्धेतही देशासाठी पदक मिळवेल,” असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या यशाबद्दल वाशी परिसरातून हिंदवीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी जागतिक स्पर्धेत ती उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.