वाशी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यभर २० जूनपासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला असून मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन नागरिकांना एनुमरेशन फॉर्मचे वाटप करीत आहेत. सर्व पात्र मतदारांनी हा फॉर्म काळजीपूर्वक भरून त्यावर सध्याचा फोटो लावून दोन प्रतींपैकी एक प्रत संबंधित बीएलओकडे जमा करावी, असे आवाहन तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे बुधवारी केले आहे.
तहसीलदार म्हेत्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी शुद्धीकरण व अद्ययावतीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी फॉर्म भरताना आपली वैयक्तिक माहिती अचूक नमूद करावी. फॉर्म भरण्याबाबत अथवा आवश्यक कागदपत्रांबाबत काही शंका असल्यास संबंधित बीएलओ नागरिकांना पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन करतील.
या मोहिमेदरम्यान मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण करण्यात येणार असून, ज्यांचे एनुमरेशन फॉर्म जमा होणार नाहीत त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदार यादीतील आपले नाव कायम राहण्यासाठी आणि मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.
प्रशासनाच्या या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी बीएलओ यांना सहकार्य करावे, वेळेत फॉर्म भरून जमा करावा आणि मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी केले आहे.