
फोटो : पारगाव जिल्हा परिषद गटातील पशुपालकांना मोफत मका बियाण्यांचे वाटप करताना जिल्हा परिषद सदस्या सविता विकास तळेकर.
वाशी | ई-लोकनीती न्यूज- ०७ जुलै २०२६
……………..
पशुधनासाठी वर्षभर दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि चारा टंचाईवर प्रभावी उपाययोजना व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील पशुपालकांना सोमवारी (ता. ६) मोफत मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या सविता विकास तळेकर यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत पिंपळगाव कमळेश्वर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिंपळगाव येथे, तर तांदुळवाडी पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणाऱ्या पशुपालकांना जवळका येथे मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या योजनेमुळे पशुपालकांना हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यास मोठी मदत होणार असून दुग्ध व्यवसायालाही चालना मिळणार आहे.
यावेळी सविता तळेकर यांनी पशुपालकांना मार्गदर्शन करताना, “शासनाकडून मिळालेल्या बियाण्यांचा योग्य वापर करून चारा पिकाची लागवड करावी. यामुळे पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध होईल आणि पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम बनेल,” असे आवाहन केले.
बियाणे वितरणानंतर सविता तळेकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर यांनी परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. जवळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फिरता दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय तसेच शेंडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या कार्यक्रमास पशुवैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने पशुपालक शेतकरी उपस्थित होते.