अपूर्ण डिव्हायडर ठरत आहे अपघाताला निमञण; सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार कधी?

फोटो ओळ  – अपूर्ण डिव्हायडरमुळे रस्ता ओलांडताना घसरून झालेले दुचाकी अपघात.


वाशी, दि. २२ (प्रतिनिधी) : वाशी फाटा ते शहर या मुख्य मार्गावरील माऊली पेट्रोल पंप ते अजित पेट्रोल पंपदरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरचे काम आजही अपूर्ण असून, हा डिव्हायडर आता वाहनचालकांसाठी अक्षरशः अपघाताला निमञण ठरत आहे. वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अद्यापही झोपेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
डिव्हायडरच्या जागी काही ठिकाणी खोल खड्डे पडले असून, रस्ता ओलांडताना दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून वाहने घसरत आहेत. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांना दिवसातून अनेकदा रस्ता ओलांडावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अपूर्ण डिव्हायडर दिसत नसल्याने अपघातांचा धोका अनेकपटीने वाढला आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी सातत्याने अपघात  घडत आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने ना डिव्हायडरचे काम पूर्ण केले, ना तात्पुरत्या सुरक्षेची व्यवस्था केली. त्यामुळे विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच विभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अपघातांची मालिका थांबवण्यासाठी डिव्हायडरचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करून सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धलात आहे.
……………..
प्रतिक्रिया

अपूर्ण असलेल्या डिव्हायडरमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून डिव्हायडरचे काम पूर्ण करावे तसेच तोपर्यंत अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्याची वेळ येण्यापूर्वीच प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”
श्री नागनाथ नाईकवाडी
शिवसेना गटनेते नगर पंचायत वाशी

Leave a Comment

error: Content is protected !!