छत्रपती शिवाजी विद्यालयात १६५ विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप सेवा सहयोग फाउंडेशन व आय के एस हेल्थ कंपनीचा स्तुत्य उपक्रम


फोटो – विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थीत मान्यवर.

वाशी,दि.१० (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आय के एस हेल्थ कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवीतील विद्यार्थी तसेच शाळेच्या लक्ष्मीबाई जगदाळे मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना शनिवार दि.आठ रोजी एकूण १६५ स्कूल किटचे वाटप करण्यात आले. या किटची अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारा हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरला.
स्कूल किटचे वाटप वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच याबाबत सविस्तर माहिती देत कोणतीही अनुचित घटना घडल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
तसेच सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे, ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नये, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक, मानसिक ताणतणाव आणि व्यसनाधीनता यांसारख्या विषयांवरही त्यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.


विद्यार्थ्यांना स्कूल किट उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेतल्याबद्दल पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सेवा सहयोग फाउंडेशन आणि आय के एस हेल्थ कंपनीचे विशेष कौतुक केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री मिळण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. थोरबोले, पर्यवेक्षक बी. एम. सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख, डी. के. घुमरे , सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. आर. थोरबोले यांनी केले. सूत्रसंचालन एस. एस. धारकर व जी. एम. देशमुख यांनी केले, तर आभार गिरी मॅडम यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!