तेरखेडा जि.प. गटात बदलाचा कौल; पंचरंगी लढतीत नव्या नेतृत्वाचा निर्णायक विजय


वाशी, ता. १० (प्रतिनिधी) : तेरखेडा जिल्हा परिषद गटातील पंचरंगी निवडणूक लढतीत अखेर मतदारांनी बदलाला कौल दिला. ‘अनुभव विरुद्ध नवखेपणा’ या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या या लढतीत शिवसेनेचे संदेश ऊर्फ विकी चव्हाण यांनी निर्णायक विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी उमेदवार बिभीषण खामकर यांचा पराभव केला.
(ता. ९) पार पडलेल्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संदेश ऊर्फ विकी चव्हाण यांना ७,५९३ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिभीषण खामकर यांना ६,९६१ मते मिळाली. त्यामुळे ६३२ मतांच्या फरकाने शिवसेनेने या गटात बाजी मारली. या निकालामुळे तेरखेडा जि.प. गटात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. विकासाभिमुख नेतृत्व, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने केलेली मांडणी आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी याचा फायदा संदेश चव्हाण यांना झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विजयानंतर प्रमाणपत्र स्वीकार
विजयानंतर संदेश ऊर्फ विकी चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांच्याकडून विजयी प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश म्हेत्रे, नायब तहसीलदार पूजा पाटील उपस्थित होते.
तसेच भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा. चेअरमन केशव सावंत, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड. सत्यवान गपाट, नगरसेवक शिवहार स्वामी, सुनील जाधवर, उद्धव साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या विजयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, शिवसेनेचे वर्चस्व अधिक बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!